← Musical Journey

हम है राही प्यार के !!

by Dr. Manasi Arkadi

(14)

तसं बघायला गेलं तर चित्रपटगीते हा आपला अत्यंत जिव्हाळ्याचा विषय, पण तरीही त्यातल्यात्यात काही गाणी आपल्याला जरा जास्तच आवडतात, आपलं संपूर्ण भावविश्व व्यापून टाकतात, ती कानावर पडताच मन पराकोटीचं हळवं होतं. कारणाचा विचार केला तर त्या गाण्यांचे बोल, त्यांचे गीतकार किंवा संगीतकार आवडीचे असतात इतकं साधंसरळ नसतच. पण मग तरीही का? कारण…. ती गाणी आपल्या आयुष्यातल्या कुठल्यातरी एका प्रसंगाशी किंवा टप्प्याशी इतकी घट्ट बांधली गेली असतात, की ती ऐकतांना तो प्रसंगच जणू आपण परत एकदा अनुभवतो…नव्याने जगतो!

साधारण आठवी-नववीत असतांना शेखरच्या मित्रांनी त्याला ही जाणीव करून दिली की त्याची चेहरेपट्टी एका चित्रपट अभिनेत्याशी मिळतीजुळती आहे; एक असा नायक ज्याच्या मधाळ हास्याने, प्रेम व्यक्त करण्याच्या हळुवार दिलखेचक अदाकारीने, केसांच्या महिरपी तुऱ्याने आणि देखण्या व्यक्तिमत्वाने तरुणींनाच नव्हे तर अबालवृद्धांना भुरळ घातली होती… दस्तुरखुद्द देव आनंद! ते चक्क त्याला 'देव' अशीच हाक मारू लागले. तारुण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या शेखरला हा 'साक्षात्कार' झपाटून टाकायला पुरेसा होता. गळा तर त्याच्याकडे होताच. आता त्याला जोड मिळाली होती एका सदाबहार रोमँटीक नायकाच्या चेहऱ्याची. देव आनंद यांचे चित्रपट हे बहुतांशी संगीतप्रधान होते आणि ती गाणी प्रचंड गाजली. त्या गाण्यांनी शेखरवर देखील गारुड केलं होतंच. मग काय विचारता? 'अभ्यास सांभाळून सिनेमा' असा चाकोरीबद्ध, पांढरपेशा विचार न करता तो 'सिनेमा सांभाळून अभ्यास' करायला लागला. कडेकडेने, सवडीने, जमेल तसा केला तो अभ्यास आणि झोकून देऊन, नियमितपणे आणि चिकाटीने केला तो रियाज!. 'देव आनंद यांचा सिनेमा बघणं हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो आपण मिळवणारच' या थाटात शेखरने सगळ्या 'देव' पिक्चर्सचा फडशा पाडला. ती नशा/ते गारुड इतके जबरदस्त होते की शेखर मग देव आनंद सारखीच केशभूषा आणि वेशभूषा करायला लागला आणि त्यांचीच गाणी गायला लागला. किंबहुना त्याने तीच गाणी गावित असा त्याला शाळा-कॉलेजात आग्रह होऊ लागला आणि शेखर त्यांच्या सगळ्या फर्माईशी पूर्ण करीत गेला. देव आनंद यांच्यावर चित्रित झालेल्या गाण्यांची नाळ शेखरशी ही अशी जोडली गेली.

इतकी जबरदस्त पार्श्वभूमी असतांना देखील शेखर जेंव्हा व्यावसायिक पातळीवर गाण्याचे कार्यक्रम करायला लागला तेंव्हा त्याने मराठी गाण्यांचाच आधार घेतला. 'महाराष्ट्राची लोकधारा' या कार्यक्रमाचा तो प्रभाव असावा, पण तब्बल दहा वर्ष शेखर मराठी गाणीच गायला. मराठी भाषेत असलेला गोडवा आणि आपलेपणा शेखरच्या आवाजातून पाझरत राहिला आणि मराठी रसिकांच्या मनाला थेट जाऊन भिडला. परिणाम व्हायचा तोच झाला. शेखरने स्वतःचा असा एक खास प्रेक्षकवर्ग तयार केला. ही सगळी मंडळी आता त्याच्या 'निषाद' परिवाराची सदस्य झाली होती. आणि म्हणूनच या टप्प्यावर एखादा नवीन प्रयोग ते नक्कीच स्वीकारतील असा विश्वास त्याला वाटायला लागला. हिंदी पदार्पणासाठी या पेक्षा दुसरी चांगली संधी नाही याची त्याला मनोमन खात्री पटली आणि तो लगेच कामाला लागला. आपल्या शाळा-कॉलेजच्या दिवसांना परत एकदा साद घालत, निषादच्या दशकपूर्तीच्या वर्षात, त्याने हिंदी चित्रपटगीतांच्या एक संपूर्ण नवीन कार्यक्रम जाहीर केला - अर्थातच देव गीतांचा - गाता रहे मेरा दिल!

देव आनंद यांच्या वाढदिवसाचा मुहूर्त साधून टिळक स्मारक मंदिरात २५ सप्टेंबर २००० ला शुभारंभाचा प्रयोग झाला, पण त्यादिवशी प्रचंड पाऊस पडला. त्यामुळे एरवी खचाखच भरणारे सभागृह जरा रिकामेरीकामेच होते. पण जे आले ते मात्र कमालीचे भारावून गेले होते. हा शो त्यांच्यासाठी केवळ श्रवणीय नाही तर प्रेक्षणीय ही झाला होता. कानात 'देवगाणी' आणि डोळ्यांना 'देवदर्शन' असा कॉम्बो पॅक शेखरने त्यांना दिला होता. शेखरचं विचाराल तर त्याचं मन कमी प्रेक्षकसंख्या बघून ना खट्टू झालं, ना उपस्थित रसिकांच्या कौतुकाने हुरळून गेलं. खरंतर एवढी मेहनत घेतली असतांना, एवढा पैसा त्यात गुंतवला असतांना जेंव्हा अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही, तेंव्हा त्याच्या जागी दुसरा कोणी असता तर कदाचित त्यादिवशीच्या पावसासारखा कोसळला असता. पण शेखरला त्याबद्दल विचारले असता तो फक्त इतकच म्हणाला, "वाईट तर वाटतच, बट द शो मस्ट गो ऑन". तेंव्हा एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली त्याने 'देव' ला नुसतच कॉपी केलेलं नाहीये, तर रक्तात भिनवलं आहे, 'गम और ख़ुशी में फ़र्क न मेहसूस हो जहा, में दिल को उस मकाम पे लाता चला गया' हा मंत्र त्याने देखील आत्मसात केला आहे. पर 'उपरवाला' इतना भी 'अनजान' नही है, कारण पुढे हाच शो 'हम है राही प्यार के' नावाने प्रचंड लोकप्रिय झाला…. 'जिंदगी का साथ' निभविण्याचे धडे तो असे गिरवीत होता!