← Musical Journey

स्मरणरंजन कृतद्न्यतेचे !!

by Dr. Manasi Arkadi

(13)

मला नेहमी असं वाटतं की एखाद्या निवांत क्षणी, हातात कॉफीचा 'मग' घेऊन, आपल्या लाडक्या खुर्चीत बसून शेखर जेव्हा स्वतःच्याच नादात हरवून जात असेल, तेव्हा 'निषाद'चं बालपण फ्लॅशबॅक सारखं त्याच्या डोळ्यासमोरून तरळत असेल. इतरवेळेस या आठवणींना मनाच्या तळाशी एखाद्या हळुवार कप्प्यात त्याने बंदिस्त केलं असेल, पण एक ट्रीगर मिळायचा अवकाश त्या उसळून वर येत असतील. आजचा दिवस उजाडला तो असाच एक जबरदस्त ट्रीगर घेऊन. आज १० नोव्हेंबर…. 'निषाद' चा जन्मदिवस!

'निषाद'च्या जन्माच्या वेळेची शेखरची संदिग्धता अगदी एखाद्या पहिलटकरणी सारखी होती; नवनिर्मितीचा आनंद, उत्कंठा, उत्सुकता तर होतीच, पण त्याबरोबर पॅकेज डील म्हणून आलं होतं एक दडपण, एक बांधिलकी, एक जबाबदारी; कारण शेखरला 'निषाद'ची नुसतीच स्थापना करायची नव्हती, तर त्याला नावारूपाला आणायचं होतं, खूप मोठं होतांना बघायचं होतं. मग बाळाबरोबर आई जशी पडत-धडपडत नव्याने मोठी होते, तसाच शेखर देखील चुकत-शिकत 'निषाद' बरोबरच मोठा झाला.

आज हे सगळं आठवत असतांना, त्याच्या मनाच्या कॅलिडोस्कोपमधे वारंवार फेर धरून नाचत होती ती 'निषाद'ची दशकपूर्ती! १३ नोव्हेंबर २००० रोजी बाल गंधर्व रंगमंदिरात झालेला हा प्रयोग शेखरचा १७५ वा प्रयोग होता. दशकपूर्तीचा हा सोहळा 'न भूतो न भविष्यति' असा झाला. त्याला कारणीभूत होती शेखरची एक भन्नाट कल्पना - स्मरणिका! संगीत क्षेत्राशी निगडीत असलेल्या पुण्यातील सगळ्या कलाकारांच्या कलाप्रवासाचे, त्यांच्या कौशल्याचे, कारकिर्दीचे त्यांच्या संपर्कासकट केलेले संकलन! काय नव्हतं त्यात? गायक, वादक, वाद्यवृंद निर्माते, छायाचित्रकार, विडीओग्राफर्स, साउंड रेकॉर्डीस्ट, आर्ट वर्कर्स, डान्सर्स, अरेंजर्स, पुण्यातील थिएटर्स, संगीत शिक्षण देणाऱ्या संस्था इतकेच काय तर वाद्य निर्मिती आणि दुरुस्ती करणाऱयांची देखील अत्यंत अभ्यासपूर्ण आणि सखोल अशी माहिती! त्यावर 'चार चाँद' लावले ते अरविंद गजेंद्रगडकर यांच्या 'संगीत आणि ज्योतिष' आणि शिवराज गोर्ले यांच्या 'पडद्यावरची गाणी' या लेखाने!

या स्मरणिकेचे प्रकाशन प्रसिध्द संगीतकार श्री. आनंद मोडक यांच्या हस्ते झाले. पुण्यातील तमाम कलाकार मंडळींना शेखरने निमंत्रित केले होते. निषादच्या १० वर्षाच्या प्रवासात जे जे शेखरचे सहप्रवासी होते त्या प्रत्येकाचा स्मरणिका देऊन सत्कार करण्यात आला. त्यांच्या कर्तृत्वाचे, सहकार्याचे भरभरून कौतुक शेखरने केले. एका कलाकाराने दुसरया कलाकाराचा केलेला हा सन्मान पाहण्यासाठी प्रचंड गर्दी लोटली. स्वतः पदरमोड करून शेखरने हा सोहळा रसिकांसाठी विनामूल्य जाहीर केला. शेखरचा कार्यक्रम म्हटल्यावर तो गाण्याशिवाय पूर्ण कसा होइल? मराठी चित्रपट संगीतामधील काही अजरामर रचना सादर करून शेखरने या कार्यक्रमाला शिखरावर नेले.

'निषाद' चा हा प्रवास शेखरकडून ऐकतांना मी माझ्याही नकळत मुलाखतकाराच्या भूमिकेतून श्रोत्याच्या भूमिकेत शिरले होते. आठवणींच्या राज्यात रमलेल्या शेखरच्या कातर स्वराची लय मला बिघडू द्यायची नव्हती. खटकले इतकेच की त्याच्याकडची काही कलाकार मंडळी आज या क्षेत्रात वटवृक्षासारखी स्थिरावली आहेत, पण मग ज्याच्या सावलीत आपण तग धरून राहिलो, बहरलो, विस्तारलो त्यालाच आपण विसरलो याची पुसटशी देखील जाणीव त्यांना का नसावी? चालायला शिकल्यावर ज्याने उभं रहायला शिकवलं त्याचा हात सोडून द्यायचा नसतो, एवढी साधी गोष्ट त्यांना का समजत नसावी? पण, शेखर या सगळ्याच्या पलीकडे गेला आहे. या जखमेवर जणू त्याने घट्ट खपली धरून ठेवली आहे, वाहता ठेवला आहे तो फक्त निषाद बद्दलचा अभिमान!