← Musical Journey

" देव " दर्शनाची आस ...

by Dr. Manasi Arkadi

(15)

'देव' जरी मज कधी भेटला…असं चमत्कारिक नजरेने बघू नका, हा 'देव' खरच आपल्याला १९४६ पासून कुठल्या न कुठल्या अवतारात दर्शन देत आलाय…पण रुपेरी पडद्यावर! कधी 'ये रात ये चांदनी फिर कहा' अशी व्याकूळ साद घालणारा तर कधी 'तुझे जीवन की डोर से बांध लिया है' अशी लाजत प्रेमाची कबुली देणारा, कधी 'घुंघट तो जरा ओढो' असं दबक्या आवाजात विनवणारा तर कधी 'होगा युं नशा जो तैयार वो प्यार है' अशी वहिदाला जणू प्रेमाची पाककृती समजावून सांगणारा, स्वतः रुसल्यावर 'अच्छा जी में हारी' असं मधुबाला कडून वदवून घेणारा तर नुतनचा रुसवा 'देखो रूठा ना करो' म्हणत काढणारा किंवा आशासमोर तर चक्क 'कैद मांगी थी रिहाई तो नही मांगी थी' अशी शरणागती पत्करणारा, हेमा मालिनीला 'पल भर हे लिये कोई हमे प्यार कर ले' म्हणत भंडावून सोडणारा पण तनुजा 'रात अकेली है' मूड मधे असतांना तिच्यापासून मात्र सुटका करू पहाणारा, कधी 'है आपना दिल तो आवारा' असा उगाच साळसूदपणाचा आव आणणारा तर कधी नजाकतीने 'तिला' जवळ ओढून 'लाख मनाले दुनिया साथ न ये छुटेगा' असं आश्वासन देणारा, एकीकडे 'जो भी प्यार से मिला हम उसीके हो लिये' म्हणत जीवनाला आलिंगन देणारा तर दुसरीकडे 'किसका रस्ता देखे' असं हताश होऊन विचारणारा …. एक ना अनेक. बुद्धीला ताण न देता आठवलेली ही त्या देवाची काही रूपं. प्रत्येक रूप लोभसवाणं, जीव ओवाळून टाकावसं वाटणारं आणि प्रत्येक दर्शन डोळ्यांचं पारणं फेडणारं!

अशा या 'देवा'ला प्रसन्न करून त्याला दर्शन द्यायला भाग पाडलं ते शेखरच्या खडतर तपश्चर्येने. 'गाता रहे मेरा दिल'च्या शुभारंभी प्रयोगाला देव आनंद यांनी यावं अशी शेखरची खूप इच्छा होती, त्यासाठी प्रयत्न देखील त्याने खूप केले. ते आले असता त्यांना देण्यासाठी खास एक 'मेमेंटो' पण तयार करून घेतली, पण तो योग काही जुळून आला नाही. जानेवारी २००१ ला जेष्ठ गायिका अनुराधाताईं यांना भेटायला शेखर बांद्र्याला गेला असतां, त्याने देव साहेबांची भेट घ्यायची असं ठरवलं. आधी कुठलीही अपॉइंटमेंट घेतली नसतांना, तो बेधडक त्यांच्या 'पाली हिल'च्या 'आनंद रेकॉर्डिंग स्टूडिओ' मधे जाऊन पोहोचला. त्या वैभवशाली वास्तूच्या गेट वर त्यांची वाट बघत तो उभा राहिला आणि…. त्याला त्याच्या 'विठ्ठलाचे' दर्शन घडले! शेखरच्याच शब्दात सांगायचं तर, "ते सहज माझ्याकडे दुर्लक्ष करून जाऊ शकले असते, पण ते थेट माझ्याकडे आले, माझी चौकशी केली, माझं येण्याचं कारण विचारलं आणि मग मला बसायला सांगून वर निघून गेले." थोड्याच वेळात त्यांनी शेखरला बोलावणं पाठवलं आणि 'सदियोंसे तुझसे मिलने जिया बेकरार था' असं ज्याला पोटतिडकीने सांगावं ती व्यक्ती साक्षात त्याच्या समोर बसली होती! लहान मुलाच्या उत्सुकतेने शेखरने त्यांना 'गाता रहे मेरा दिल' चा अल्बम दाखविला, त्यांच्यासाठी खास बनवून घेतलेल्या ‘मेमेंटो' चा फोटो दाखविला आणि त्यांनी अत्यंत कौतुकाने तो बघितला, स्वतःहून त्यावर स्वाक्षरी केली आणि पुढच्या कार्यक्रमाला येण्याचं कबूल देखील केलं! एका प्रदीर्घ ऋणानुबंधाची ती एक छोटीशी सुरवात होती! त्यानंतर सलग ११ वर्ष शेखर वारकर्याच्या निष्ठेने त्यांच्या वाढदिवसाला 'पाली हिल' ची वारी करायला लागला, जेंव्हा शक्य होईल तेंव्हा, जिथे शक्य होईल तिथे त्यांची भेट घ्यायला लागला. पुढे हे नातं इतकं दृढ झालं की देव साहेबांनी त्यांचा पर्सनल नंबर शेखरला दिला आणि मनात येईल तेंव्हा फोन करण्याची अनुमती देखील! या भेटींमुळे या दोघांचं नातं बहरत गेलं. देव साहेबांच्या अतिव्यग्र जीवनशैलीमुळे त्यांना शेखरच्या कार्यक्रमाला येणं मात्र कधी शक्य झालं नाही, पण हे सांगायला ते स्वतः शेखरला फोन करायचे. विश्वास बसत नाही ना? चित्रपटसृष्टीवर अनेक दशकं राज्य करणाऱ्या या बादशहाचे पाय हे असे कायम जमिनीवर होते. पण शेखरही कुठे कमी पडला नाही. त्यांचं व्यस्त शेड्युल शेखर जाणून होता आणि म्हणूनच ती 'मेमेंटो' देण्यासाठी तो स्वतः त्यांच्या घरी गेला. मनाच्या तारा जेव्हा इतक्या छान जुळतात तेव्हा 'छेडो तो एक सरगम है' असं झालं नसतं तरच नवल!

आज ४ डिसेम्बर…. देव, तुझा स्मृतिदिन! पण मुददामून स्मरण करायला तू विस्मरणात गेला आहेस कुठे? कपडे बदलतो तसे गर्लफ्रेंड/बॉयफ्रेंड बदलणाऱ्या आजच्या पिढीला बघितलं की 'मर जाऊंगा प्यार अगर में दुजा करुंगा' म्हणणारा तू आठवतोस, आजही अचानक पावसाने गाठल्यावर वळचणीला उभं असतांना तूच आठवतोस… साधनाने हळूच तुझ्या केसांमधली गवताची काडी काढल्यावर तिच्याकडे मिश्किलपणे बघून डोळे मिचकावणारा! Public display of affection च्या या युगात नूतन बरोबर कुतुबमिनारच्या पायरयांवर बसलेला असतांना मागून चाहूल लागताच तिला आणि स्वतःला कोट मागे लपविणारा तू आठवतोस, आजच्या अंगचटीला येणाऱ्या हिरोंना बघितलं की तुझा उत्कट, भावूक, हळुवार, पण संयत प्रेमाविष्कार आठवतो, 'तू कहा ये बता' म्हणत जीवाचा रान करत 'तिला' शोधणारा, पण ती दिसल्यावर कुठलाही प्रेमातीरेक न करता तिला कुर्निसात करून चक्क निघून जाणारा… जणू काही तू दिसलीस ना बास असं दुरूनच समाधान मानणारा तू आठवतोस आणि वाटतं तुझी प्रेयसी असल्याचा त्याक्षणी नूतनलाच विलक्षण अभिमान वाटला असेल.

देव, तुला 'इतिहासजमा' करणं केवळ अशक्य! अरे म्हणूनच तुझ्या black and white 'हम दोनो'ची पारायणं झाली असतांना देखील रंगीत 'हम दोनो' रिलीज झाल्या बरोबर तिकिटाच्या रांगेत आम्ही भक्तिभावाने जाऊन उभे रहातो! आम्हीच काय आमच्या पुढच्या पिढ्या देखील तुझ्यावर असच प्रेम करतील! आमच्या मनातून तुला चोरून नेण्याएवढी पुण्याई कोणाचीही नाही आणि म्हणूनच आम्ही 'देव'भक्त कायम हेच म्हणत राहू…. काळ येई, काळ जाई, 'देव' आहे तैसा राही!