← Musical Journey

नया दौर !!

by Dr. Manasi Arkadi

(21)

प्रति एक झाडामाडा त्याची त्याची रुपकळा, प्रति एक पानाफुला त्याचा त्याचा तोंडवळा

असो पाखरू वा मासोळी जीव जीवार मुंगळी, प्रत्येकाची टेव ठेव काही आगळी वेगळी

असो ढग असो नग त्याची अदभुत रेखणी, जी जी उगवे चांदणी तिच्या परीने देखणी

ही झाली बा. भ. बोरकरांची शैली, पण साध्या सोप्या भाषेत सांगायचं तर जन्माला येणारा प्रत्येक जीव हा खास आहे, इतरांपेक्षा वेगळा आहे, कोणीही कमी अधिक नाही, प्रत्येकजण त्याच्या परीने विलक्षण! पटत नाहीये का? मग जरा आपल्या चित्रपटसृष्टीची ५०-६० ची दशकं आठवून बघा. देव आनंद, राज कपूर, दिलीप कुमार, शम्मी कपूर, मधुबाला, मीना कुमारी, नूतन किती किती नावं घेऊ… सभी हसीं, सभी जवां, कहाँ पे दिल को हारिये, तुम्हीच सांगा. प्रत्येकाची स्वतःची अशी एक खुबी, एक स्टाईल, एक खासियत, एक नखरा…. 'लट है किसीकी जादू का जाल, रंग डाले दिल पे किसीका जमाल' अशी स्थिती. पण त्यामुळे झालं काय, नक्की कोणा एकाला 'खयालोंकी मलिका किंवा मालिक' म्हणून शोर्ट-लिस्ट करावे हे न समजल्याने आपण प्रत्येकावर मनापासून प्रेम करत गेलो. भरीसभर म्हणजे यांच्या वाट्याला आलेली अवीट माधुर्य असलेली गाणी, मग काय विचारता 'दर्शन मात्रे आणि श्रवणे मात्रे मनकामनापूर्ती' अशी आपली अवस्था झाली. आपल्यासारख्यांची ही कथा तर शेखर सारख्या गवय्याचं काय झालं असेल?

या सर्व 'हृदयस्थांची' गाणी आपल्यापर्यंत पोहचवायची हे शेखरचं स्वप्न होतं, त्या दृष्टीने त्याचे प्रयत्नही चालू होते. पण…. हे वाद्यवृंद रुपी शिवधनुष्य दिवसेंदिवस जड होत चालले होते, एकट्याने ते पेलवणे त्याला अवघड जात होते. अशाही परिस्थितीत सलग एकवीस वर्ष शेखर उत्तोमोत्तम कार्यक्रम सादर करीत राहिला, पण मर्यादा या येतच होत्या. सगळे दरवाजे बंद होत चालले आहेत की काय असं वाटत असतांनाच, नियतीने एक दरवाजा त्याच्यासाठी किलकिला केला… कॅराओके ट्रॅक्स! तोवर, २०१०-२०११ या वर्षांमध्ये शेखरने त्याच्या वाद्यवृंदात अशा एखाद-दोन गाण्यांचा समावेश केला होता, पण संपूर्ण शो ट्रॅक्स वर ही कल्पना साहसी होती. पण, एके दिवशी ती वेळ आलीच… ४ डिसेंबर २०११ साली शेखरचे दैवत, देव आनंद काळाच्या पडद्याआड गेले. त्यांना श्रद्धांजली अर्पण करिण्याकरता लवकरात लवकर आपण काहीतरी करावे हा विचार शेखरला स्वस्थ बसू देत नव्हता. तेव्हा, ट्रॅक्सवर संपूर्ण शो तारून न्यावा असा धाडसी निर्णय त्याने घेतला. प्रतिसाद किती मिळेल, कसा मिळेल हे सगळे प्रश्न त्यावेळी दुय्यम होते, महत्वाचे होते ते देव साहेबांना आदरांजली वाहणे. ४ जानेवारी २०१२ रोजी बाल शिक्षण सभागृहात शो झाला तो देव साहेबांवर चित्रित आणि केवळ ट्रॅक्सवर आधारित गाण्यांचा! देव साहेबांच्या आशीर्वादाने म्हणा किंवा शेखरच्या निरपेक्ष हेतूमुळे म्हणा हा शो कमालीचा यशस्वी झाला. एक नवं दालन शेखरसाठी खुलं झालं!

ट्रॅक शोज् बद्दल बोलतांना शेखर म्हणतो की त्याचे फायदे-तोटे दोन्ही आहेत. "लाईव्ह ऑर्केस्ट्राची मजा मी रसिकांना देऊ शकत नाही, पण परिपूर्णतेचा आनंद मात्र नक्कीच देऊ शकतो." खरंय, प्रशिक्षित आणि कुशल वादकांची उपलब्धता आणि ती ही एकाच दिवशी एकाच वेळी…थोडे अवघडच. त्यावर मूळ गाण्यात वापरलेली सगळीच वाद्य आणि ती वाजविणारे वादक ऑर्केस्ट्रासाठी मिळणे अजूनच दुरापास्त. ट्रॅक्समुळे हा सगळाच प्रश्न निकालात निघाला. या ट्रॅक्सना ऑडियोविजुअल्सची खमंग फोडणी देऊन शेखरने शो ची लज्जत अजूनच वाढविली. नायक-नायिकेच्या अदाकारीसकट पेश केलेली गाणी ऐकून आणि बघून रसिकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले.

त्यानंतरच्या सलग चार वर्षांमध्ये शेखरने वेगवेगळ्या नायकांवर आधारित शोज् ची निर्मिती केली. देव साहेबांचा 'हम है राही प्यार के', शम्मी कपूरचा 'दिल देके देखो', राजेश खन्नाचा 'प्यार दिवाना होता है', राज कपूरचा 'सपनोंका सौदागर' आणि मराठी चित्रपटगीतांचा 'मंतरलेल्या चित्रबनात'! फिरता गळा असल्याने शेखर ही किमया सहज साध्य करू शकला. देव साहेबांची प्रेमाची हळुवार अभिव्यक्ति असो किवा शम्मीचा धसमुसळेपणा, राजेश खन्नाचा रोमॅंटिक अंदाज असो किंवा मग राज कपूरचा आर्त, मनाचा तळ ढवळून निघेल असा प्रेमाविष्कार, शेखर सगळ्याला न्याय देत आला. प्रसंगी भावनाप्रधान झाला, पण भावनाविवश नाही. आवाजावरचे नियंत्रण, ट्रॅकचे भान त्याने कधीही सुटू दिले नाही. तो हे सगळं जरी लीलया करीत असला, तरी ट्रॅक्सवर गाणे वाटते तितके सोपे नाही. एरवी गायक ऑफबीट गेल्यास, वादक त्याला सांभाळून घेऊ शकतो, त्याच्या लयीशी, पट्टीशी जुळवून घेऊ शकतो, पण ही सोय ट्रॅकवर गातांना नाही. इथे तालाचं गणित न चुकू देण्यासाठी कमालीची एकाग्रता लागते. पण, या जबाबदारीचं जाणीव शेखर आणि त्याच्या सहकलाकारांनी नेहमीच ठेवली. म्हणूनच राजेश खन्नाच्या शोच्या आदल्या दिवशी विजुअल्सची सीडी करप्ट झाली असतांना आणि नेपथ्य, प्रकाशयोजना, किंवा डान्स या पैकी काहीही जोडीला नसतांना, केवळ या कलाकारांच्या आवाजावर लक्ष केंद्रित करीत रसिकांनी तो शो देखील उचलून धरला!

हा प्रसंग सांगतांना शेखर अंतर्मुख होतो, गहिवरून जातो. रसिकांनी दिलेल्या पाठींब्याचा वारंवार उल्लेख करीत राहतो. शेखर, 'निषाद' हा तुझा परिवार आहे असं तूच नेहमी म्हणतोस ना? मग, २५ वर्षाच्या या साहचर्यात तू हे असं कितीदा तरी अनुभवलं असशील. कठीण समय येता तुझ्या कामास येणारे कैकजण असतील, फक्त 'मै हूँ ना' म्हणण्याची, दिलासा देण्याची, पाठीशी उभं राहण्याची पद्धत मात्र प्रत्येकाची वेगळी असेल एवढं मात्र निश्चित… भेटे जे जे त्यात भरे लावण्याची जत्रा, भाग्य केवढे यातूनच चालली 'निषाद'ची रौप्यमहोत्सवी आनंद यात्रा!