← Musical Journey

अशी ही " दादागिरी " !

by Dr. Manasi Arkadi

(20)

हमको जो ताने देते है, हम खोये है इन रंगरलीयोमें, हमने उनको भी छुप छुप के, आते देखा इन गलीयोमे ...'अमर प्रेम' मध्ये राजेश खन्ना साठी किशोरदांनी गायलेले हे गीत ऐकले की अर्थार्थी काहीही संबंध नसलेला आणि या चित्रपटाशीही निगडीत असण्याची सुतराम शक्यता नसलेला एक कलाकार माझ्या डोळ्यासमोर येतो - दादा कोंडके! त्यांच्या चित्रपटांच्या बाबतीत असच काहीसं म्हणावं लागेल. ज्या 'सो कॉल्ड सॉफीसटीकेटेड' मंडळींनी 'दादांच्या' चित्रपटांना कायम नाकं मुरडलेली, त्यांनी डान्स पार्टीज् किंवा पिकनिक्सच्या वेळी मात्र 'त्यांच्याच' गाण्यांची 'फ़र्माईश' केली! थोडक्यात काय, हा इरसालपणा लई आवडतोय, फक्त…. 'स्टेटस' च्या बुरख्या आडून! पण खरं सांगू, या अशा उच्चभ्रू लोकांसाठी या अवलियाने चित्रपट कधी केलेच नाहीत. केले ते रोजच्या बेचव, निरस आयुष्याला द्व्यर्थी गीतांचा गावरान तडका देवू इच्छीणारयांसाठी, मोल-मजुरी करून मरगळलेल्या देहासमोर 'इष्काचा अँटमबॉम्ब' पेटवून त्यांच्यात शिट्ट्या वाजविण्याची उर्मी पैदा करण्यासाठी, संसाराच्या गाडा ओढून पिचलेल्या जीवाला 'माळाच्या मळ्यामंदी कोण गं उभी' असं डोकावून पहावं वाटणाऱ्यांसाठी आणि हातावर पोट असणाऱ्यांना 'चंदनाच्या पाटावर सोन्याच्या ताटामंदी मोत्याचा घास' खावासा वाटणाऱ्यांसाठी!

'निषाद ऑडिओ-विजूअल्स'चा राजीनामा दिल्यानंतर शेखरची वाटचाल जरा धीम्या गतीनेच चालली होती. काही हितचिंतकांनी (?) अशाही वावड्या उठविल्या होत्या की शेखर आता यापुढे वाद्यवृंदांमधून गाणार नाही! त्यामुळे सगळं पुर्वव्रत सुरळीतपणे सुरु करणे त्याच्यापुढे आव्हानच होते. अशातच २०१० च्या मे महिन्यात संपन्न होणाऱ्या 'सातारा फेस्टिवल' साठी त्याला विचारण्यात आले. या अगोदर निषादच्याच 'रंग लोककलेचा ' या कार्यक्रमाला सातारकरांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. त्यामुळे आत्ताची ऑफर 'ऑन पब्लिक डिमांड' होती! बसलेल्या सेटबॅक मधून सावरण्याची ही नामी संधी स्वतःहून शेखरकडे चालत आली होती. सातारकरांच्या पसंतीला परत एकदा उतरावं आणि त्यांचा आपल्यावरचा विश्वास सार्थ ठरावा यासाठी शेखरच्या डोळ्यांसमोर नाव तरळले.... 'शाहीर दादा कोंडके! राजेश जोशी आणि प्रवीण पाटील या आयोजकांना ही कल्पना भन्नाट आवडली. मग काय 'निषाद'च्या परंपरेला अनुसरून, कुठलीही कमतरता न ठेवता, सहा नृत्यांगना आणि पंधरा जणांच्या नृत्यसमूहाला घेऊन शेखरने फक्त महिन्याभरात एका भव्य कार्यक्रमाची निर्मिती केली- 'दादागिरी'! [शीर्षक - शिवराज गोर्ले]

या कार्यक्रमाचा आकर्षण बिंदू ठरला तो 'दादांच्या' चेहरेपट्टीशी साम्य असलेला कलाकार - केतन साळवी ! केतनच्या चेहऱ्यात दडलेल्या दादांना शेखरने हुडकले होते, त्याची हि अफलातून डिस्कवरी कल्पनेपेक्षा जास्त यशस्वी झाली. दादांना असं मूर्तिमंत स्टेज वर बघून प्रेक्षक हरखून गेले. ‘काय गं सखू बोला दाजीबा, आली मुंबईची केळेवाली, मी तर भोळी अडाणी सखू, हिल हिल पोरी हिला, चंदनाच्या पाटावर , देईन तुला कायमची पोरी दौलत ही तीन लाखाची... या गाण्यांच्या वेळी केतनला मूळ गीतातील वेशभूषेसह सादर करून शेखरने धमाल उडवून दिली. 'वर ढगाला लागली कळ' या तब्बल आठ अंतरे असलेल्या गाण्यात, दर अंतरयाला केतन बरोबर एक नवीन नृत्यांगना देऊन तर शेखरने कळस गाठला!

'अंजनीच्या सुता, गेली सांगून ज्ञानेस्वरी, आंधळा मारतोय डोळा, चल रं शिरपा देवाची किरपा, डौल मोराच्या मानाचा, तू छत्तीस नखरेवाली, माझा वाघ्या, आल्या आल्या जाऊ नका, रंग नको टाकू माझी भिजेल कोरी साडी, घ्याल का हो राया एक शालू बनारसी' अशी एका पेक्षा एक झिंग आणणारी गाणी नृत्यासह पेश करून शेखर आणि त्याच्या टीमने एक वेगळाच माहोल तयार केला. पण, या सगळ्या इरसालपणाला एक हळवी किनार जोडायला तो विसरला नाही…. दादांबरोबर काम केलेल्या जगदीश खेबुडकर, अशोक सराफ, जयश्री टी, मधु कांबीकर, राहुल सोलापूरकर या मान्यवरांची दादांविषयीची मनोगते 'शूट' करून त्याने पडद्यावर ती टप्याटप्याने दाखवली. रसिकांना हा प्रकार खूपच भावला. टाळ्यांच्या गजरात आणि शिट्ट्यांच्या कहरात हा प्रयोग प्रचंड यशस्वी झाला!

शेखर मात्र याचं श्रेय निर्माता, दिग्दर्शक, अभिनेता, गीतकार आणि शाहीर असलेल्या अष्टपैलू दादांना देतो. या कार्यक्रमाची निर्मिती ही त्यांना वाहिलेली आदरांजली होती असं तो नम्रपणे सांगतो. पण शेखर, दादांच्या गाण्यांची गोडी तसूभरही कमी झालेली नाही, त्यांनी रंगविलेला भोळसट नायक आजही लोकांना तेवढाच आपलासा वाटतोय, पिझ्झा-बर्गरच्या या युगात हा गावरान मेवा अजूनही त्याची लज्जत टिकवून आहे, पिटातल्या प्रेक्षकांची नस ओळखून लिहिलेल्या द्व्यर्थी गाण्यांनी आजच्या high profile मंडळीना देखील तेवढ्याच गुदगुदल्या होत आहेत हे तूच तर सिद्ध करून दाखविलस! तेव्हा, आम्ही मात्र तुम्हा दोघांनाही मानतो… खऱ्याअर्थाने लोककलावंत असलेल्या दादांना आणि त्यांच्या स्मृती, या अशा कार्यक्रमाची निर्मिती करून, ताज्या ठेवणाऱ्या तुला. तूच तर हे पटवून दिलस ….दादा, एक सांगायचं हाय तुमास्नी, आज बी समद्यास्नी तुमचाच लळा हाय!!