← Musical Journey

नभ उतरू आलं ...

by Dr. Manasi Arkadi

(6)

काही चित्रपट आपल्या मन:पटलावर कायमचे कोरले जातात. रोजच्या रहाटगाडग्यात ते आठवतीलच असे काही नाही, पण त्यांची स्मृती मात्र मनात कायम रेंगाळत रहाते. पूर्वी 'चित्रहार' बघताना त्या आठवणी ताज्या होत, पण आता ती सोयही उरली नाही. तरी, आजही सकाळच्या घाईच्या वेळी दुरून कुठूनतरी एखादी लकेर जरी कानावर पडली तरी मन लगेच प्रसन्न होते, नकळत चेहऱ्यावर हसू येते आणि तो मूड दिवसभर रहातो. संगीतात इतकी जबरदस्त ताकद आहे. मराठी वाद्यवृंद ऐकायला आपण मुद्दामून जातो ते याच कारणासाठी. मनाची बॅटरी एकदा का अशी चार्ज करून घेतली की परत रोजचा गाडा ओढायला आपण मोकळे आणि त्यातून कार्यक्रम जर शेखरचा असेल तर मग विचारूच नका! एकाच गाण्यातून तो ही किमया सहज साध्य करतो. आपली आवडती गाणी गाऊन संपूर्ण चित्रपट आपल्या डोळ्यासमोर उभे करण्याचे सामर्थ्य त्याच्या गायकीत आहे.

शेखरने रसिकांची नस बरोबर ओळखली आहे. अगदी सुरवातीपासूनच त्याने सतत काहीतरी नवीन आणि वेगळं देण्याचा प्रयत्न केला. शेखरने दुसरा कार्यक्रम जो केला तो दोन अशा चित्रपटातील गीते घेऊन जे चित्रपट आपल्या स्मृतीतून कधीही पुसले जाणार नाहीत. एक 'पिंजरा' आणि दुसरा 'जैत रे जैत'.

जैत रे जैत… स्मिता पाटीलच्या सावळया सौंदर्याने, मोहन आगाशेंच्या दमदार अभिनयाने, जब्बार पटेल यांच्या कौशल्यपूर्ण दिग्दर्शनाने, हृदयनाथ मंगेशकर यांच्या अवीट गोडीच्या संगीताने आणि महानोरांच्या दर्जेदार काव्याने हा चित्रपट अजरामर झाला. काडीमोड घेतलेल्या चिंधीची आणि ढोलीयाची ही प्रेमकहाणी. वारली समाज-ठाकर लोकांच्या जीवनावरील हे कथानक होते. यातली गाणी ठाकर समाजातील श्रद्धा, समजुती, रिती-रिवाज यावर आधारित होती. हृदयनाथजींनी जानपद ढंग आणि पाश्चात्य शैली यांच्या मिश्रणातून लोकसंगीताला वेगळेच वळण दिले आणि ही गाणी प्रचंड गाजली. डोंगर काठाडी ठाकरवाडी, जांभूळ पिकल्या झाडाखाली, मी रात टाकली, नभं उतरू आलं.. अशी छोटी-मोठी मिळून २८ गाणी या चित्रपटात होती. ही सगळीच गाणी, वेगळा बाज, भाषा ठाकरी असून देखील, आपल्या तोंडात सहज बसली.

पिंजरा.. ही एका तत्वनिष्ठ व ब्रह्मचारी शिक्षकाची एका वारांगनेच्या क्षणिक मोहाच्या पिंजऱ्यात अडकून झालेल्या अधःपतनाची कथा. 'श्रीधरपंताच्या' भूमिकेतून डॉ. श्रीराम लागू यांनी अभिनयाचा उच्चांक गाठला. शंकर पाटील यांच्या दमदार कथेचे व्ही. शांताराम यांनी सोने केले. या सोन्याला झळाळी देण्याचे काम जगदीश खेबुडकर यांनी केले आणि राम कदम यांनी त्यातील लावण्यांना सालंकृत केले. मला इश्काची इंगळी डसली, आली ठुमकत नार लचकत, कशी नशिबाने थट्टा, छबीदार छबी, तुम्हावर केली मी मर्जी बहाल, दिसला ग बाई दिसला, दे रे कान्हा चोळी लुगडी, मला लागली कुणाची उचकी.. सगळीच्या सगळी गाणी एकहाती गाजविण्याची किमया राम कदम यांनी केली.

या दोन्ही चित्रपटातील गीतांनी आपल्या सारख्या 'कानसेनांना' जर इतकी भुरळ घातली, तर शेखर सारख्या 'तानसेनाची' काय कथा! या दोनच चित्रपटातील गीतांना घेऊन शो करणे हा अभिनव प्रयोग त्याने केला आणि त्यात तो यशस्वी देखील झाला. वाद्यवृन्दाच्या इतिहासात असा प्रयत्न ना त्या आधी कोणी केला होता ना त्या नंतर !

२४ मे १९९४ ला टिळक स्मारक मंदिरात पहिला शो झाला; पूर्वार्धात जैत रे जैत आणि उतरार्धात पिंजरा. ही संकल्पना पूर्णपणे नवीन होती आणि शेखरने धुमधडाक्यात ती रसिकांसमोर मांडली. अतिशय भव्य असा वाद्यवृंद त्याने वापरला. कुठेही तडजोड नाही की काटकसर नाही. अर्थात अनिल सातपुते या त्याच्या मित्राने त्याला खूप मदत केली हे शेखर आवर्जून सांगतो. सुप्रसिद्ध सिंथेसायजर वादक विवेक परांजपे यांनी या शो चे संगीत संयोजन केले होते तर विख्यात अभिनेते, नटसम्राट यशवंत दत्त यांनी निवेदन. जी. मल्लेश, ज्यांनी मूळ गाण्यात झील गायली आहे, त्यांनाही शेखरने या शो साठी आमंत्रित केले होते. दस्तुरखुद्द हृदयनाथ मंगेशकर हे देखील या शो ला उपस्थित होते आणि त्यांना निमंत्रण द्यायला शेखर स्वतः 'प्रभू कुंज' वर गेला होता. हृदयनाथजींच्या हस्ते सगळ्या कलाकारांना मानचिन्हे देऊन त्यांचा गौरव करण्यात आला होता.

परिपूर्णतेच्या ध्यासाने झपाटलेल्या शेखरने छोट्यातल्या छोट्या गोष्टीवर सुद्धा प्रचंड मेहनत घेतली होती. सर्वोत्तम देण्याची त्याची धडपड त्याच्या प्रत्येक कृतीतून दिसून येत होती. पुढच्या काही कार्यक्रमात तर त्याने चक्क लावणी ग्रुपला घेऊन गायन, वादन आणि नृत्य असा त्रिवेणी संगमही साधला होता. ही भव्यता…ही श्रीमंती बघून शेखरचे खूप कौतुक झाले आणि शेखरची ख्याती 'लिंगोबाच्या डोंगरासारखी' आभाळा पर्यंत गेली!