सहकारी कलाकार - २
by Dr. Manasi Arkadi
(24)
मुघल सम्राट अकबर अतिशय शक्तिशाली आणि पराक्रमी राजा होता. असे असूनही त्याची कला, साहित्य, स्थापत्य व संगीतातील जाण कोणत्याही पंडिताला साजेशी अशी होती. याचे कारण त्याची 'नवरत्ने!' गुणवंताची पारख असलेल्या अकबराच्या दरबारी अशी काही विद्वान मंडळी होती ज्यांच्यामुळे त्याचा दुहेरी फायदा होत होता; एक तर त्याचे स्वतःचे ज्ञान अप-टू-डेट रहात होते आणि दुसरे असे की त्यांच्या असण्यामुळे दरबार-ए-अकबरीचा नावलौकिक सर्वदूर पसरला होता. 'निषाद' दरबारी पण कैक अशी रत्ने आहेत ज्यांच्या असामान्य प्रतिभेमुळे, व्यक्तिगत आयुष्यात त्यांनी नाव कमावलेलेच आहे, पण त्यांच्या 'निषाद'शी असलेल्या बांधिलकीमुळे 'निषाद'ला सुद्धा एक वेगळीच झळाळी प्राप्त झाली आहे आणि या सगळ्याचा शेखरला प्रचंड अभिमान आहे.
अकबर बादशहाकडे एक चतुर, बुद्धिमान, हजरजवाबी आणि विनोदबुद्धी ठासून भरलेला एक हरफनमौला होता - राजा बिरबल. 'निषाद'कडे मात्र असे दोन अवलिये आहेत; एक आहे अभय गोखले -गायक, अभिनेता आणि निवेदक अशा तीनही कलांवर प्रभुत्व असणारा हरहुन्नरी कलाकार! सन २००० पासून सातत्याने १५ वर्षे शेखरबरोबर निषादच्या विविध मराठी कार्यक्रमांमधे अभयचा सक्रिय सहभाग आहे. सहकलाकार आणि मित्र अशा दोनही पातळ्यांवर शेखर आणि अभय चे सूर छान जुळलेले आहेत.
दुसऱ्या अवलियाला आपण डॉ. अमित त्रिभुवन या नावाने ओळखतो! व्यवसायाने डॉक्टर असल्याने समोरच्याची 'नस' ओळखण्याचे कसब, रक्तात भिनलेला मिश्कीलपणा, वारसाहक्काने आलेलं वाकचातुर्य, आवाजावर झालेले संस्कार, रेडीओ-थिएटरच्या कामाची पार्श्वभूमी, जबरदस्त निरीक्षणशक्ति, अफाट वाचन, शब्दफेकीवर मिळविलेले नियंत्रण या गुणांच्या पाठबळावर अमितने 'निषाद' मधले आपले स्थान खुंटी पिळवटून पक्के केले आणि गाण्याएवढेच निवेदनही श्रवणीय असते हे सिद्ध केले. दोन गाण्यांमधल्या वेळेत गप्पा मारणाऱ्यांना आणि मध्यंतरात गर्दी होईल या भीतीने काही कामे आधीच उरकून घेणाऱ्यांना खुर्चीला खिळवून ठेवण्याची किमया डॉ. अमितने करून दाखविली. निवेदन ऐकण्यासाठी अधीर झालेले आणि सरसावून बसलेले लोक 'निषाद'च्या कार्यक्रमातच पाहायला मिळतात. एकमेकांवर कुरघोडी न करता परस्पर पूरक निवेदन करून Chemistry कशाला म्हणतात याचे उदाहरणच जणू अमित आणि शेखर या जोडगोळीने दिले आहे.
'जिथे कमी तिथे मी' अशी 'नारायणा'ची भूमिका निषादसाठी जगणारा एक आसामी म्हणजे शेखरचा धाकटा भाऊ गिरीश! शेखर जेव्हा वाद्यवृंदासहित शोज् करायचा तेव्हा गिरीश तबलावादकाच्या भूमिकेत असायचा, पण जसजसं ट्रॅक शोज् करण्याकडे शेखरचा कल वाढायला लागला, तसतशी गिरीशच्या कामाची व्याप्ति देखील! शेखरच्या भाषेत सांगायचं तर 'गिरीश हा निषादचा कणा आहे. खूप आधार वाटतो त्याचा.' खरच आहे ते; नैपथ्य गिरीश महामुनी, आसन व्यवस्था गिरीश महामुनी, आर्टवर्क गिरीश महामुनी, पाहुण्यांचे आगत-स्वागत गिरिश महामुनी आणि शेखर स्टेज वर असतांना विंगेत किंवा प्रेक्षागृहात काही अडचण आल्यास त्याचे निराकरण करून 'शांतता आणि सुव्यवस्था' प्रस्थापित करण्याचे काम देखील गिरीश महामुनीच! उच्च विद्याविभूषित आणि त्याचबरोबर तबला विशारद असलेला गिरीश खऱ्या अर्थाने अष्टावधानी आहे!
' वा रेवा ' अशी दाद मिळविणारी शेखरची सहगायिका रेवा तिजारे ही देखील निषादच्या आधारस्तंभांपैकी एक आहे. आपल्या गोड गळ्याने आणि गोड खळीने ती श्रोत्यांची लाडकी गायिका झाली आहे. गाण्यागणिक खुलत जाणारी रेवा, प्रोग्रॅममधे रंग भरते. 'सा रे ग म' फेम जुईली जोगळेकर देखील 'निषाद'साठी दोन वर्ष गायली आहे. प्रज्ञा देशपांडे हिच्या आवाजाच्या ताकदीविषयी काय बोलू? शास्त्रीय आणि सुगम दोन्ही आघाड्या उत्तमरित्या सांभाळणारी गायिका हिच्या रुपात 'निषाद'ला लाभली आहे. प्रीती पेठकर ही सुद्धा हळू हळू आपलं स्थान निर्माण करण्यात यशस्वी होत आहे.
या सगळ्यांबरोबरच एका नावाचा उल्लेख शेखर आवर्जून करतो- प्रसिद्ध लेखक शिवराज गोर्ले! नवोदित कलावंतांचे 'पडीक' असण्याचे ठिकाण म्हणजे बालगंधर्व कट्टा ! तिथे सहज झालेली यांची ओळख पुढे सखा, तत्वज्ञ आणि मार्गदर्शक म्हणून करून द्यावी लागेल अशी शेखरला पुसटशीही कल्पना नव्हती. आज गोर्ले सर 'निषाद'चे अविभाज्य घटक बनले आहेत. शेखरच्या कित्येक शो ज् ची टायटल्स गोर्लेसरांचीआहेत आणि वेळप्रसंगी ते चक्क निवेदनाला देखील उभे राहिले आहेत. जहिरातींच्या कॅच लाईन्स, प्रमोशन.. थोडक्यात जिथे कमी शब्दात बरच काही सांगायचं असतं, तिथे गोर्ले सरांना
