← Musical Journey

मुहूर्तमेढ !

by Dr. Manasi Arkadi

(3)

कुणीतरी अशी पटापट गम्मत आम्हा सांगेल काय? या टोपीखाली दडलय काय? या मुकुटाखाली दडलय काय?…गाणं आठवतंय?… शेखर सारख्या लोकप्रिय गायकाच्या मुकुटाखाली पण अशा असंख्य गोष्टी दडल्या आहेत…. अनेक अनुभव, अनेक किस्से, कौतुकाचे शब्द, शाबासकीची थाप आणि…. अवहेलना देखील. शेखर त्याच्या आठवणींच्या पोतडीतून जेव्हा एक एक गोष्ट बाहेर काढत जातो तेव्हा मनोमन हे पटत जाते की पत, पैसा आणि प्रसिद्धी या 'प' त्रयी मागे एक चौथा 'प' आहे, किंबहुना त्याच्या वाट्याला जरा जास्तच आलेला आणि तो म्हणजे - परिश्रम.

दहावी नंतरची चार वर्षे, म्हणजे १९८६ ते १९९०, शेखरचा उमेदवारीचा काळ होता. या चार वर्षात त्याने सोहन आणि मोहन सबनीस यांच्या त्रिमिती कला मंच, ज्ञानज्योत संस्था, ऑर्केस्ट्रा - द टेम्पेस्ट, आणि शाहीर पुणे (जी त्रिमिती कला मंचचाच एक भाग होती) या चार संस्थांमध्ये काम केले. त्रिमिती कला मंचचे ऋण शेखर आजही विसरू शकत नाही. येथे कोरस मध्ये गाताना अनेक गोष्टी त्याला शिकायला मिळाल्या. त्याचा फायदा त्याला 'शाहीर पुणे' या संस्थेत लीड सिंगर म्हणून गाताना झाला. शेखरचे मामा, यशवंत वेदपाठक या संस्थेचे संस्थापक होते.

सुरवातीपासूनच शेखरने एक नियम स्वतःसाठी घालून घेतला होता तो म्हणजे एखादं गाणं तो गाणार असो किंवा आणखी कोणी, त्या गाण्याचे बोल, त्याचे नोटेशन्स, त्यातील महत्वाच्या जागा तो त्याच्या वहीत लिहून काढीत असे. या अभ्यासाचा त्याला खूप फायदा झाला. शिवाय, त्याने स्वतःला एकाच गीतप्रकारात मर्यादित ठेवले नाही. ओवी, भारुड, धनगरगीत, कोळीगीत, लोकगीत, चित्रपटगीत, भक्तीगीत, भावगीत असे अनेक गीत प्रकार त्याने गायले आणि त्या प्रत्येकात तो यशस्वी देखील झाला. इथेच त्याच्या आवाजाला, त्याच्या गायकीला पैलू पडत गेले. त्याची ही जिद्द, चिकाटी आणि मेहनत घेण्याची वृत्ती संजय गायकवाड यांनी हेरली आणि त्याला हिंदी शो मध्ये ब्रेक दिला - ऑर्केस्ट्रा - द टेम्पेस्ट. शेखर 'ज्ञानज्योत' या संस्थेत देखील त्यावेळी गात होता. एकीकडे ही सगळी धडपड सुरु होती आणि दुसरीकडे त्याचे graduation!

या चारही संस्थांचे शेखरच्या आयुष्यातले योगदान खूप मोलाचे आहे. एखादा शो करायचा असे ठरल्यावर किती बाजू सांभाळाव्या लागतात आणि कशी तारेवरची कसरत करावी लागते हे त्याने स्वतः अनुभवले आणि एखाद्या टीपकागदा प्रमाणे तो हे सगळं आत्मसात करत गेला. यातूनच स्वतःची एक संस्था सुरु करावी हा विचार जन्माला आला. कुणा दुसऱ्याच्या हाताखाली, त्याच्या मर्जीनुसार, तो म्हणेल तसे काम करणे हा शेखरचा पिंड कधी नव्हताच. स्वतःचे विचार, इच्छा, संकल्पना जर मांडायचची असेल तर स्वतःची संस्था असणे खूप गरजेचं आहे हा विचार त्याला स्वस्थ बसू देईना. हे नवं क्षितीज आता त्याला खुणावू लागले होते.

काळ होता १९९०, वय केवळ १९ आणि सोबतीला सूर जुळलेले मित्र - जितेंद्र कुलकर्णी, अमर ओक, केदार मोरे आणि धाकटा भाऊ गिरीश. अर्थात 'झलक, पुणे' या प्रसिद्ध संस्थेचे दयानंद घोटकर आणि उमेश चावक यांचीही त्या काळात शेखरला खूप मदत झाली आणि या सगळ्यांच्या सोबतीने १० नोव्हेंबर १९९० ला शेखरने 'निषाद, पुणे' ची मुहूर्तमेढ रोवली!