← Musical Journey

रंगूनी रंगात साऱ्या ...

by Dr. Manasi Arkadi

(11)

एकदा पु. ल. एका पार्टीला गेले असतांना एका ENT डॉक्टरने त्यांना विचारले, "पु. ल., मला एक सांगा, साहित्य, संगीत, नाटक सगळंच कसं काय बुवा तुम्हाला जमतं?" त्यावर पु. ल. मिश्किलपणे हसून म्हणाले, "तुम्हाला नाही का कान, नाक, घसा सगळं एकाच वेळी तपासता येतं…. अगदी तसंच!" यातील गमतीचा भाग सोडून द्या, पण पु. ल. खरोखरच एक अष्टपैलू व्यक्तिमत्व होते. हे असे कलाकार प्रशिक्षण देऊन तयार करता येत नाहीत, तर ते जन्माला यावे लागतात. मला वाटते, त्यांच्या genes मधेच असे काहीतरी असावे ज्यामुळे ते सगळ्या कलांकडे आकृष्ट होतात, कुठलेही रीतसर शिक्षण न घेता ते आत्मसात करतात आणि त्यात पारंगतही होतात. शेखर हा एक उत्तम गायक कलाकार म्हणून जरी आपल्याला परिचित असला तरी त्याच्यात देखील एक चित्रकार, एक कवी आणि एक लेखक दडून बसले आहेत. संगीतावरच्या अतीव प्रेमामुळे आणि व्यस्त जीवनशैलीमुळे इतर कलाप्रकारांसाठी सध्या त्याच्याकडे पुरेसा वेळ नाहीये, पण तरीही या सुप्त कला अधून-मधून आपल्या अस्तित्वाची त्याला जाणीव करून देत असतात.

दहावीच्या सुट्टीत 'सहज' म्हणून काढलेले स्केचेस, स्केचिंगचा कोर्स करून देखील बहुधा जमणार नाहीत, इतके आखीव-रेखीव आहेत. जेव्हा एखादा कलाकार व्यक्तिचित्रे रेखाटतो तेव्हा जर ती व्यक्ती इतरांना फारशी परिचित नसेल, तर काही फीचर्स रेखाटतांना थोडे फेरफार करण्याची लिबर्टी तो घेऊ शकतो. पण हेच रेखाटन जर एखाद्या जगप्रसिद्ध व्यक्तीचे असेल तर?… सायन्स आणि भूमितीच्या आकृत्या काढण्याव्यतिरिक्त हातात पेन्सील न धरलेले महाभाग देखील त्यावर आपली 'विशेष टिप्पणी' द्यायला मागे-पुढे पहात नाहीत आणि शेखरने तर आपल्या रेखाटनासाठी बॉलीवूडच्या तारे-तारकांची निवड केली होती - एक असा विषय ज्यावर प्रत्येक दुसरा भारतीय प्रबंध लिहू शकेल! पण शेखरने अत्यंत बारकाव्यांसकट, त्या कोवळ्या वयात, चितारलेल्या रेखाचीत्रांनी सगळ्यांना थक्क करून सोडले.

प्रेम… एक नितांत सुंदर तरल भावना! ते फुलपाखरी दिवस आठवले की आजही मन पिसासारखं हलकं होतं आणि हवेत तरंगायला लागतं. आपल्यासारख्यांची ही गत तर या कविमनाच्या लोकांचे काय होत असेल! कवी मंगेश पाडगांवकरांनी खरंतर आपल्याला खूप समजावून सांगितलंय की 'तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं'… कबुल, सगळ्यांनीच आयुष्याच्या त्या त्या टप्प्यावर हे भावविश्व अनुभवले आहे, पण तरीही तुमच्यासारख्या संवेदनशील लोकांचं व्यक्त होणं आणि आमच्यासारख्यांचं व्यक्त होणं अजिबात सेम नसतं आणि म्हणूनच असेल कदाचित हा विषय पिढ्यानपिढ्या सगळ्यांनाच भुरळ घालत आलाय. ही भावना जरी एक असली तरी तिला असंख्य पदर आहेत आणि प्रत्येक पदराची एक वेगळी खुमारी! शेखरच्या प्रेम कवितांमधे (ज्या त्याने त्याच्या 'फुलपाखरी' दिवसांमध्ये केल्या आहेत) 'तिच्या' विषयी वाटणारी ओढ आहे, 'ती' जवळ नसल्याची रुखरुख देखील आहे, पण निराशावादी सूर नाहीये; जणू काही ही फेज देखील तो एन्जॉय करतोय. ती हुरहूर, ती अधीरता, तिकडे 'तिचं' काय होत असेल या विचाराने येणारी गोड अस्वस्थता एकदम 'दिल से' उतरली आहे. मग इथे छंद, वृत्त, मात्रा, मीटर या चौकटी गळून पडतात. 'साहित्यिक मुल्य' वगैरे सारख्या अवजड शब्दांना तर थाराच नसतो. ती असते फक्त शब्दात मांडलेली एक उत्कट भावना आणि त्याच नजरेने तिच्याकडे बघितल्यास ती थेट मनाला जाऊन भिडते!

बॉलीवूड हा तर शेखरचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आणि या विषयावरचे त्याचे वाचन देखील अफाट आहे. चित्रिकरणादरम्यान घडलेले किस्से या विषयावर त्याने 'दै. सकाळ' मधे केलेले स्तंभलेखन आपल्यापैकी बहुतेकांनी नियमितपणे वाचले असेल. अत्यंत माहितीपूर्ण आणि मनोरंजक असे ते लेख होते. शेखरची खासियत अशी आहे की प्रत्येक लेखाची सुरवात उत्कंठा वाढविणारी असते, तर शेवट कधी चुटपूट लावणारा, कधी डोळ्यांच्या कडा ओलावणारा तर कधी चेहऱ्यावर समाधानाचे हसू आणणारा. प्रत्येक लेखात एक पुलींग पॉवर आहे ज्यामुळे तो लेख पूर्ण वाचल्याशिवाय खाली ठेववत नाही. आपल्या सुदैवाने त्याने स्वतःमधील ही कला अजून जिवंत ठेवली आहे.

कलाकार, मग तो कुठलाही असो, जात्याच संवेदनशील असतो. इतरांपेक्षा कुठलीही भावना त्याला जरा जास्तच प्रकर्षाने जाणवते आणि मग ती व्यक्त करण्यासाठी त्याचा स्वतःचा असा एक मार्ग असतो. शेखरकडे तर मोकळं व्हायला चौपद्री रस्ता आहे. कुणी सांगावं, शेखरचं गातांना हळवं होणं कदाचित याचाच एक भाग असेल, पण…. मी याबद्दल नाही त्याला जास्त काही विचारलं…कवी वैभव जोशींनी म्हटलंय.... 'प्रत्येक डोहाचा तळ गाठायलाच हवा असे नाही!’